CM Devendra Fandavis on Parbhani Violence :परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची माथेफिरूने तोडफोड केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या बंदला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे दुपारनंतर शहरात जमावबंदी लागू करावी लागली. यावेळी आंदोलकांनी काही दुकानांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या काही गाड्यांवरही दगड फेकले. तसेच जाळपोळ केल्याचेही समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपीला अटक झाल्यानंतर हिंसा करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
परभणीत दोन दिवसांपूर्वी एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाची तोडफोड केली होती. त्यानंतर या माथेफिरुला पोलिसांनी तात्काळ अटक केली. मात्र बुधवारी या घटनेच्या पार्श्वभूमीवर परभणीत बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक आणि जाळपोळ केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या हिंसक आंदोलनावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथे आता शांतता असल्याचे म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीतून बोलत होते.
"परभणीत संविधानाच्या प्रतिमेसोबत माथेफिरुनी केलेल्या गोष्टीचा निषेधच केला पाहिजे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथेफिरू आहे. तो एक प्रकारचा मनोरुग्ण आहे. त्याला लगेच अटक झालेली आहे. अटक झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होते हे काही योग्य नाही. जे लोक भारताच्या संविधानाला मानतात आणि जे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात अशा लोकांनी नेहमी संवैधानिक मार्ग पत्कारला पाहिजे. अटक झाल्यानंतर हिंसा करणे हे काही योग्य नाही. तिथे आता शांतता आहे. भविष्यातही शांतता राहावी असा आमचा प्रयत्न आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
परभणीत उद्रेक
बुधवारी परभणी येथे काळी कमान खानापूर फाटा याशिवाय कॅनॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंबेडकरी चळवळीतील समर्थकांनी टायर जाळून आंदोलनास सुरुवात केली होती. परभणी शहर बंदची हाक दिल्याने आज शहरातील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. मात्र त्यानंतर आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. विसावा कॉर्नर परिसरामधील व्यापाऱ्यांनी बाहेर ठेवलेले पीव्हीसी पाईप पेटवून देण्यात आले. आंदोलनास हिंसक वळण लागल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.
दुसरीकडे, महिलांसह आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून खिडक्यांची तावदाने, खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच शहरात काही दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली.