जिंतूर :-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याच्या कारणावरून परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. यानंतर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण आले तर काही शिवसैनिकांनी खासदार जाधव यांच्यावरच उलट आरोप केले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रशासक मंडळाला तात्पुरता स्थगिती आदेश दिला आहे.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचे प्रशासक मंडळ 25 ऑगस्ट रोजी नियुक्त करण्यात आले होते. याच कारणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार संघर्ष झाल्याचे पाहावयास मिळाला. खासदार संजय जाधव यांनी 26 ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर परभणी येथील राष्ट्रवादी भवनवर काहीजणांनी दगडफेक केली. तर गंगाखेडचे शिवसेना सभापती यांनी खासदारांवर राजीनाम्याचे नाटक करत असल्याचा आरोप केला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याचे चिन्ह निर्माण झाले होते.
यादरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने खासदारांना मुंबईला बैठकीसाठी बोलावले होते. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंतूर आणि मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकास स्थगिती देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशासक मंडळ नियुक्तीला 27 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती आदेश दिला.