- प्रमोद साळवेगंगाखेड : तालुक्यात गोदावरी नदीकाठी वाळू माफियांनी अवैध वाळू उपशासाठी अनेक शकला लढवत उपशाचा सपाटाच लावला आहे. मात्र, तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्यासह महसूल पथकाने वाळू माफियांच्या सर्व शकला उधळवून टाकत मंगळवारी दिवसभरात धारखेड व झोला गोदाकाठच्या परिसरात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करत वाळू माफियांना पळता भुई केली. या कारवाईत महसूल पथकाने गोदावरी नदीत अक्षरशः पोहत पोहतच २ तराफे ताब्यात घेऊन जाळून नष्ट केले.
तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी महसूल पथकाला सोबत घेत सकाळी ९ पासून ते सायंकाळी ६ पर्यंत तालुक्यातील गोदाकाठी वाळू माफियांविरोधात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवत ‘तटबंदी’ केली. पथकामध्ये तहसीलदार यांच्यासोबत नायब तहसीलदार अशोक केंद्रे, नायब तहसीलदार सुनील कांबळे, मंडळ अधिकारी चंद्रकांत साळवे, अशोक आहेर, सुनील चाफळे, अर्जुन आघाव, संतोष भारसाखरे, कृष्णा सोडगीर, एकनाथ शहाणे, कृष्णा जाधव, शंकर राठोड, संतोष इप्पर, चालक सुरेश भालेराव यांचा समावेश होता. गोदाकाठच्या धारखेड ते झोला परिसरात तहसीलदारांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची दोन पथकांत विभागणी करत वाळू माफियांना घेरले. झोला ते धारखेड शिवारात गोदावरी नदीत अत्यंत अवघड ठिकाणी माफियांनी तराफे तैनात केले होते. मात्र, महसूल पथकाने थेट गोदावरीत पोहोच पोहोचत २ तराफे ताब्यात घेऊन जाळून नष्ट केले.
‘खबरीलाल’ शोधण्याची गरजतहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी गोदाकाठच्या अवैध वाळू उपशावर अंकुश ठेवण्यासाठी १० ते १२ दिवसांत तीन मोठ्या कारवाया केल्या. मात्र, यामध्ये वाळू माफिया पळून जाण्यात यशस्वी होत आहेत. तिन्ही कारवायांत एकही वाळू माफिया घटनास्थळावर महसूल पथकाच्या हाती लागला नाही, याचाच अर्थ वाळू माफीयांना महसूल पथक येत असल्याची खबर देणारा ‘खबरीलाल’ हा ‘झारीतल शुक्राचार्य’च असण्याची शक्यता असल्याने अधिकाऱ्यांना कारवाईत यापुढे मोठी गोपनीयता पाळावी लागणार असल्याची स्थिती पुढे आले आहे.
मुख्य सूत्रधारांची पाळंमुळं शोधागंगाखेड तालुक्याला गोदावरी नदीचे नैसर्गिक वरदान आहे. मात्र, तालुक्याच्या सर्वदूर गोदाकाठी वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा करत महसूलच्याच काहींना हाताशी धरत कोट्यवधींची माया कमावली आहे. अवैध वाळू उपसा करण्यासाठी गोदाकाठी माफियांचे अनेक सूत्रधार आहेत. या सूत्रधारांची पाळंमुळं शोधण्याचे आव्हान तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्यापुढे यानिमित्ताने उभे राहिले आहे.