परभणी : जिल्ह्यात थंडीची लाट सुरू झाली असून, सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात ९ अंशापेक्षा पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.
या वर्षीच्या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून, जिल्ह्यातील सर्व प्रकल्प पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. याशिवाय भूजल पातळीमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हिवाळ्यातही वातावरणात चांगलाच गारवा राहील, असा अंदाज यापूर्वीच बांधलेला होता. या अंदाजानुसार हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या तापमानात घट नोंद केली जात आहे. तीन दिवसांपासून तापमान घटले आहे. सोमवारी ८.८ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी ८.५ अंश आणि आज बुधवारी ८ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून, नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा वापर सुरू केला आहे.
हिवाळ्यात आरोग्य संवर्धनासाठी नागरिक विशेष काळजी घेत असतात. त्यातूनच पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या आता वाढली आहे. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, राजगोपालाचारी उद्यान आणि जिल्हा स्टेडियम परिसरात नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी येत आहेत. एकंदर थंडीचा परिणाम जिल्ह्यातील जनजीवनावर जाणवू लागला आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत वातावरणात चांगलाच गारठा निर्माण होत असून, सायंकाळच्या सुमारास मुख्य रस्त्यांवरील वाहतूक विरळ होत आहे.