परभणी : जिल्ह्याच्या तापमानात लक्षणीय घट झाली असून, बुधवारी किमान तापमान ९ अंश नोंद झाले आहे.
यावर्षी हिवाळ्यामध्ये सुरुवातीला जिल्ह्यात किमान तापमान ८ अंशापर्यंत घसरले होते. त्यानंतरच्या आठवड्यात मात्र तापमानात वाढ होत गेली. आता पुन्हा किमान तापमान कमी होत असल्याने नागरिकांना थंडी जाणवू लागली आहे. चार दिवसांपासून तापमानात घट होत आहे. बुधवारी ९ अंशापर्यंत किमान तापमान घसरल्याने वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला होता. आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर नागरिकांनी पहाटेच्या सुमारास हुडहुडी भरणारी थंडी अनुभवली.
दरम्यान, तापमानात घट झाल्याने सकाळचे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. वाढलेल्या थंडीमुळे पहाटे मॉर्निंग करणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून आले. दवबिंदू साचल्याने वातावरणात धुके पसरले होते. येत्या काळात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.