परभणी : सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याचा लिलाव करुन शेतकर्यांचे पैसे परत करावेत, या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अखेर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी ६ जानेवारी रोजी कारखान्याचा लिलाव करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांनी परभणीत हे आंदोलन केले. सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याने २०१५-१६ हंगामासाठी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, भोकर, अर्धापूर या गावांमधील शेतकर्यांचा ऊस गाळपासाठी आणला. परंतु, या शेतकर्यांना उसाचे पैसे दिले नाहीत. याबाबत तक्रारी केल्यानंतर साखर आयुक्तांनी कारखान्याचा लिलाव करुन उसाचे पैसे देण्याची जबाबदारी परभणी जिल्हाधिकार्यांवर सोपविली. मात्र या कारखान्याचा लिलाव होत नसल्याने संतप्त शेतकर्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
या इशार्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. दुपारी १२ वाजेच्या सुमारास १०० हून अधिक शेतकरी जिल्हा कचेरीत दाखल झाले. त्यानंतर या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शेतकर्यांना चर्चेसाठी बोलाविले. यावेळी शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत लिलावासाठी येणार्या अडचणीही त्यांनी शेतकर्यांना सांगितल्या. अखेर ६ जानेवारी रोजी पाथरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कारखान्याचा लिलाव केला जाईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, परभणी येथील किशोर ढगे, भास्कर खटींग, दादाराव जोंधळे, सुदाम ढगे, केशव आरमळ, डिगांबर पवार आदींसह बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.