परभणी : आधुनिक वाल्मिकी म्हणून गौरवपूर्ण उल्लेख असणाऱ्या ग. दि. माडगूळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील विजयश्रीनगरात १९ डिसेंबर रोजी आयोजित कविसंमेलनात एकापेक्षा एक सरस कवितांचे सादरीकरण करुन कविंनी चांगलीच रंगत भरली. ब्रह्मकला ग्रुपच्या वतीने महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा यांच्या बालगंधर्व हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कवी दिलीप चारठाणकर, महेश देशमुख, दीपक कुलकर्णी, मनीषा जोशी, मनीषा आष्टीकर, संतोष सेलूकर, अनुराधा वायकोस, मनीषा उमरीकर, पल्लवी चारठाणकर, प्रमोद बल्लाळ, मधुकर उमरीकर आदी कवींनी कविता सादर केल्या. दिलीप चारठाणकर यांनी गदिमा यांच्या ‘जोगीया’ या कवितेचे वाचन करुन ग. दि. माडगूळकर यांना शब्द आदरांजली वाहिली. ‘केस तुहे सखे गोड गं, झुरझुरती ओढ गं..., ओढ गं... तू पपईची फोड गं...!’ या गदिमांच्या कवितेने एकच हंशा पिकला. कवी निवेदक महेश देशमुख यांच्या बाभूळ, सर-सर झर-झर तसेच ‘जग बदलले तसे नाती बदलली, पाणी खळाळत नाही, आता माती बदलली’ ही कविता सादर केली. मनीषा जोशी यांनी डोह, सखा या कविता सादर केल्या.
मनीषा आष्टीकर यांनी प्रतिकूलतेत अनुकूलता शोधत आपला ठसा उमटविणाऱ्या गृहिणीचे चित्र कवितेतून सुंदररित्या व्यक्त केले. तसेच राधा ही कविता सादर केली. दीपक कुलकर्णी यांनी प्रभावती नगरी, पाऊलखुणा व कृष्ण मुरारी तर संतोष सेलूकर यांनी कवी, शाळा या कविता सादर केल्या.
नव्याने गझल लिहून उत्तम सादरीकरण करणाऱ्या अनुराधा वायकोस यांनी आपल्या दोन गझल सादर करून वाहवा मिळविली.
‘गदिमा’ यांच्या स्मृतिदिनानिमित्त मनीषा उमरीकर, पल्लवी चारठाणकर यांनी गदिमांच्या कविता म्हटल्या. कवी महेश देशमुख यांच्या सुश्राव्य निवेदनात कविसंमेलन उत्तरोत्तर रंगले. ब्रह्मकला ग्रुपचे शंकर आजेगावकर व मधुकर उमरीकर यांनी कवींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमोद बल्लाळ, प्रवीण वायकोस, प्रकाश बारबिंड, विलास कौसडीकर, कोटीखाने यांच्यासह अनेकांची याप्रसंगी उपस्थिती होती.