परभणी : खरीप हंगामात पीककर्जापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना रबी हंगामात प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याचा निर्णय ५ नोव्हेंबर रोजी आ. मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न मार्गी लागल आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आ. मेघना बोर्डीकर यांनी ३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाल्याने प्रशासनाने तातडीने उपोषणाची दखल घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आ. मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध निर्णय घेण्यात आले.
त्यामध्ये रद्द केलेेले कर्ज प्रस्ताव परत मागवून घेणे, वयाच्या अटीचे कारण देत रद्द केलेल्या प्रस्तावांना मंजूर करणे, शेतकऱ्यांच्या मागणी अर्जांची नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांना पंधरा दिवसांत सॉफ्टवेअर पुरवणे, शेतकऱ्यांसाठी एस.एम.एस. सुविधा उपलब्ध करुन देणे, दत्तक शाखा बदललेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून त्यांना पीक कर्ज दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही, त्यांचे प्रस्ताव मागवून रबी हंगामात कर्जाचा पुरवठा करणे, जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत आ. मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले हे प्रश्न मांडले. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील हट्टेकर यांच्यासह सर्ब बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.