पाथरी (परभणी ) : मागील वर्षात १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरली असून, तालुक्यातील पाथरी ते आष्टी या राज्य महामार्गाची दुरवस्था अद्यापही कायम आहे. त्यामुळे ग्रामस्थ, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पाथरी ते आष्टी हा २८ कि.मी.चा रस्ता पाथरी तालुक्यातून जातो. यातील २० कि.मी.चा रस्ता पाथरी उपविभागामध्ये येते. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. पाथरी पासून ३ कि.मी. रस्त्यावरील खड्डे थातूर-मातूर बुजविण्यात आले. त्यानंतर हे काम बंद पडले आहे. सध्याच्या रस्त्याच्या कडेला खडी पडल्याचे दिसून येत आहे.
खड्डे बुजविण्यासाठी खडी आणून टाकली असली तरी काम मात्र अजूनही सुरू केले नाही. सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. यातील वरखेड ते हादगाव या रस्त्याची तर दयनीय अवस्था झाली आहे. दोन जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता असून खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. २० कि.मी. अंतर कापण्यासाठी १ ते २ तास लागत आहेत. अनेक वेळा अपघाताच्याही घटनाही घडल्या आहेत. आता तरी हा रस्ता वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणी होत आहे.
दळणवळण व्यवस्थाच कोलमडलीतालुक्यातील पाथरी-आष्टी या प्रमुख रस्त्यासह इतर ग्रामीण रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दळण-वळण व्यवस्थाही कोलमडली आहे. रात्रीच्या वेळी एखाद्या रुग्णास तातडीने दवाखान्यात न्यावयाचे असल्यास मोठी पंचाईत निर्माण होत आहे. अशीच स्थिती काही पुलांचीही असून कठडे नसल्याने अपघाताची शक्यताही बळावत आहे. याकडे लक्ष देऊन तालुक्यातील रस्त्यांची कामे हाती घेऊन दर्जेदार कामे करावीत, अशी मागणी वाहनचालक, ग्रामस्थांमधून होत आहे.