गंगाखेड (परभणी ) : जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही विनापरवाना मोर्चा काढणाऱ्या सुमारे ३०० पेक्षा अधिक मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात खासदार संजय उर्फ बंडु जाधव, रासपाचे नेते रत्नाकर गुट्टे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम यांच्यासह विविध पक्ष्यांच्या नेत्यांचा समावेश आहे.
गंगाखेड शहरातील इसाद रोड स्थित रामेश्वर नगर येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा सोहळा पोलीस निरीक्षक सोहन माछरे व त्यांच्या सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी खंडित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत दि. २९ जानेवारी मंगळवार रोजी अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या वतीने संत जनाबाई मंदिर ते गंगाखेड तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा काढत पोलीस निरीक्षक यांचा निषेध व धिक्काराच्या घोषणा दिल्या होत्या.
जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दि. ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केलेले असताना ही बेकायदेशीररित्या जमाव जमवून मोर्चाची परवानगी नसताना विनापरवाना मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत मोर्चा दरम्यान पोलिसांबद्दल चुकीचे सांगून जनतेत पोलिसांची प्रतिमा मलीन केल्यावरून पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात मंगळवार रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दिलेल्या फिर्यादीवरून कलम १८८ भादवी. व मुंबई पोलीस कायद्याचे कलम १३५ अन्वये सुमारे ३०० पेक्षा अधिक मोर्चेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव, रासपचे नेते रत्नाकर गुट्टे, भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम आदींसह विविध पक्षाचे पुढारी, पदाधिकारी तसेच महाराजांचा समावेश आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात हे करीत आहेत.