जिल्ह्याच्या मतदार यादीत सर्व मतदारांची नावे, छायाचित्रे असावीत, यासाठी निवडणूक विभागाने मोहीम सुरू केली आहे. ज्यांची छायाचित्रे यादीत समाविष्ट नाहीत, त्यांना छायाचित्र उपलब्ध करून देण्यासाठी ५ जुलैपर्यंतची डेडलाइन देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात परभणी, पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या चारही मतदारसंघांतील सर्व मतदारांची नावे आणि त्यांची छायाचित्रे जिल्ह्याच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे ५ जुलैनंतर नावे कमी करण्याचा इशारा निवडणूक विभागाने दिला असला तरी प्रत्यक्षात सर्वांचीच छायाचित्रे यादीत समाविष्ट असल्याने जिल्ह्यातील मतदारांना नाव वगळण्याची चिंता राहिलेली नाही.
छायाचित्र जमा करण्यासाठी ५ जुलैची डेडलाइन
निवडणूक विभागाच्या आवाहनानुसार प्रत्येक मतदाराला त्याचे छायाचित्र निवडणूक यादीत समाविष्ट करणे गरजेचे आहे. हे छायाचित्र देण्यासाठी ५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ५ जुलैनंतर मात्र मतदाराचे छायाचित्र यादीत समाविष्ट नसल्याने त्याचे नाव यादीतून वगळण्याची प्रक्रिया केली जाईल, असा इशारा निवडणूक विभागाने दिला आहे. परभणी जिल्ह्यात हे काम यापूर्वीच १०० टक्के झाल्याने मतदार निश्चिंत आहेत.
मतदार यादी इपिकसह
जिल्ह्यातील सर्व मतदारांची छायाचित्रांसह नावे घेण्याची मोहीम येथील निवडणूक विभागाने मागील वर्षीच राबिवली.
जिल्ह्यातील सर्व मतदारांची छायाचित्रे यादीत उपलब्ध आहेत.
गतवर्षी मतदान केंद्रनिहाय ही मोहीम राबविली होती. त्यामुळे यावेळेस छायाचित्र पुन्हा घेण्याची गरज राहिली नाही.
परभणी जिल्ह्यात मागील वर्षी वेळोवेळी मतदार यादी सुधारित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. विशेष म्हणजे मतदार केंद्रनिहाय नियुक्त केलेल्या बीएलओंच्या माध्यमातून सर्व मतदारांचे छायाचित्र संकलित करण्यात आले. हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने यावेळेस राबवलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील एकाही मतदाराला छायाचित्र निवडणूक विभागाकडे देण्याची आवश्यकता नाही.