देवगाव फाटा (जि. परभणी) : सेलू पालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याच्या गोंधळाबाबत भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे कार्यकर्त्यांसह रविवारी (दि. २६) दुपारी २ वाजेच्या सुमारास नगरपालिका कार्यालयात आले होते. कर्मचाऱ्यांचे प्रश्न उपस्थित करताना माजी आमदार बोर्डीकर हे उपमुख्याधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेले. घडलेल्या प्रकारानंतर पालिकेकडून पोलिसांना नगरपालिकेत पाचारण करण्यात आले होते.
सेलू पालिकेने निवडणूक आयोगाच्या आदेशाने नगरपालिका निवडणुकीची १३ प्रभागांसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २१ जून रोजी प्रसिद्ध केली. यामध्ये एकूण ४१ हजार ६६३ मतदार आहेत. निवडणुकीसाठीचे इच्छुक व पॅनलप्रमुखांना प्रारूप मतदार यादीतील मतदारांची नावे राहत असलेल्या प्रभागाऐवजी दुसऱ्या प्रभागात गेल्याचे दिसून आले. जवळपास दोन हजार मतदारांना याचा फटका बसणार आहे. ५७ अर्जांच्या माध्यमातून एक हजार ५००हून अधिक मतदारांनी यात आक्षेप नोंदवले आहेत. याच अनुषंगाने प्रारूप मतदार यादीबाबत विचारणा करण्यासाठी भाजपचे माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर हे कार्यकर्त्यांसह रविवारी दुपारी २ वाजता सेलू नगरपरिषदेत आले. मुख्याधिकारी देवीदास जाधव व उपमुख्याधिकारी अक्षय पल्लेवाड यांना माजी आ. बोर्डीकर यांनी याबाबत विचारणा केली. २७ जूनपर्यंत आक्षेप स्वीकारण्यासाठी वेळ आहे, असे उपमुख्याधिकारी अक्षय पल्लेवाड यांनी सांगताच माजी आ.बोर्डीकर हे बाचाबाची करत पल्लेवाड यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी मुख्याधिकारी देवीदास जाधव यांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत केले. दरम्यान, पालिका प्रशासनाने तत्काळ पोलिसांना पाचारण केले होते. या प्रकाराबाबत दोेन्ही बाजूने कोणतीही तक्रार किंवा गुन्हा नोंद झाला नव्हता.
रागाच्या भरात ते धावून गेलेमाजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी प्रारूप मतदार यादीसंदर्भात आक्रमकपणे बरेच प्रश्न उपस्थित केले. त्यांना आम्ही दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. रागाच्या भरात ते उपमुख्याधिकारी पल्लेवाड यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, मी त्यांना आवरले.- देवीदास जाधव, मुख्याधिकारी, सेलू
मोठा वाद झाला नाहीप्रारूप मतदार यादीत सेलू पालिका प्रशासनाने कायदेशीर बाबीला बगल दिली आहे. एका ठिकाणी राहत असलेल्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात घातली हा मनमानी कारभार झाला आहे. याबाबत संभाव्य उमेदवार आक्रमक झाले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना मी सोमवारी भेटणार आहे. रविवारी पालिकेत गेलो असता केवळ बोलाबोली झाली; पण मोठा वाद झाला नाही.- रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार, जिंतूर