परभणी - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे, ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. ओबीसी समाजाचं राज्यातील 27 टक्के राजकीय आरक्षण रद्दबातल केल्यामुळे सध्या होत असलेल्या 105 नगरपंचायतींच्या निवडणुकीत ओसीबी समजाला स्थान नाही. त्यामुळे, विविध संघटना आणि नेते एकत्र येऊन मेळावे व बैठका घेत आहेत. परभणीतील एका मेळाव्याला रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी, काँग्रेस आणि भाजपवर त्यांनी टीका केली.
काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष ओबीसींना न्याय देऊ शकत नाहीत. भाजपचा देखील ओबीसी आरक्षणाला विरोध होता, पण त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता, अशी आठवण जानकर यांनी सांगितली. ओबीसींचं आरक्षण जाण्याला काँग्रेस आणि भाजपा दोघेही जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये ओबीसी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात महादेव जानकर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, जेव्हा कलम 340 आणि 341 लिहिलं गेलं तेंव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. त्यावेळी ओबीसी आरक्षणाला तमाम भारतीय जनता पक्षाचा विरोध होता. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचा व्हीप बाजूला ठेवून संसदेत आवाज उठवला होता. भाजपात ओबीसीबाबत बोललं की संपवलं जातं, असा आरोपच जानकर यांनी केला.