परभणी: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत सहभागी असलेला काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील दहा पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार तथा खासदार संजय जाधव यांनी लेखी पत्राद्वारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत बिघाडी झाल्याचे समोर आले आहे.
खासदार संजय जाधव यांनी ३० मे रोजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी बरेच परिश्रम घेतले. मात्र काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराचे उघडपणे काम करून पक्ष विरोधी कार्य केल्याची खंत या पत्रात व्यक्त केली. यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नाना राऊत, प्रदेश सचिव सुरेश नागरे, माजी जि. प. सदस्य अविनाश काळे, ओबीसी सेलचे केशव बुधवंत, बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नागरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष तुकाराम साठे, माजी नगरसेवक विशाल बुधवंत, विश्वजीत बुधवंत, प्रदेश सरचिटणीस हरिभाऊ शेळके, माजी नगरसेवक बबलू नागरे या दहा जणांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा तन-मन-धनाने प्रचार केल्याची तक्रार खासदार संजय जाधव यांनी नाना पटोले यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
विशेष म्हणजे केवळ प्रचार न करता मतदारांत काँग्रेस नेतृत्वाबद्दल अपशब्द वापरले. त्याचबरोबर विरोधी उमेदवाराला स्वतः घरी व पक्ष कार्यालयात बोलून पक्षविरोधी काम केले. त्यामुळे पक्ष विरोधी काम करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला धोका निर्माण होणार नाही, अशी विनंती या पत्रात करण्यात आलेली आहे. हे पत्र ३० मे रोजी लिहिले असून समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पत्राची दखल घेऊन काय कारवाई करतात, याकडे जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे समोर आले आहे.
पत्रकार परिषदेतही केला होता उल्लेखपरभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी विजय मिळवल्यानंतर मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये माझा विजय झाला असला तरीही, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी काम केले आहे. याबाबत लेखी तक्रार काँग्रेसच्या नेतृत्वाला केली असल्याचे मंगळवारी खासदार जाधव यांनी सांगितले होते.