परभणी : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असल्याची स्थिती पुढे आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनांनंतर समाज बांधवांकडून नेत्यांना गाव बंदी करण्यात येत असल्याने पुढारी सुद्धा आता आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. काल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर परभणीतील आमदार सुरेश वरपूरकर हे देखील सोमवारी मुंबईत दाखल झाले असून मराठा आरक्षणासंदर्भात आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकणारे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील आंदोलनाची मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी अंतरवालीत येऊन आगामी ४० दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या आश्वासन दिले होते. परंतु सरकारने आजपर्यंत सकारात्मक निर्णय घेतला नसल्यामुळे जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहे. त्यांच्या या उपोषणाला आता राज्यभरातून प्रतिसाद मिळत असल्याने ही परिस्थिती कशी हाताळावी असा प्रश्न सरकार पुढे उभा टाकला आहे.
सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत पुढार्यांना गावात येऊ देऊ नका, त्यांना गावबंदी करा असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनास राज्यभरातून प्रतिसाद मिळत असल्याने पुढार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपूरडकर यांनी देखील अशीच भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी ते सोमवारी मुंबईत दाखल झाले असून आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इतर आमदारांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेत मराठा आणि धनगर आरक्षणासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. यात आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे.