परभणी : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांपैकी प्रत्येकी ४ जिल्ह्यांमधून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हद्दपार झाली असून, शिवसेनेला तीन जिल्ह्यांमध्ये खातेही उघडता आलेले नाही़
विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबर रोजी जाहीर झाल्यानंतर आता राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत काय चित्र राहिले याची आकडेमोड राजकीय तज्ज्ञांकडून सुरू झाली आहे़
मराठवाड्यातील परभणी, नांदेड, उस्मानाबाद व औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही़ तर हिंगोली, उस्मानाबाद, बीड व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही़ लातूर, बीड व जालना या तीन जिल्ह्यांत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही़ भाजपचे मात्र मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत उमेदवार निवडून आले आहेत़ त्यामुळे मराठवाड्यात भाजपाची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे़ पक्षीय बलाबलाचा विचार केला असता भाजपाचे १६, काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी ८, शिवसेनेचे १२ आणि शेकाप व रासपचा प्रत्येकी १ आमदार निवडून आला आहे़
मराठवाड्यात सर्वाधिक १ लाख १९ हजार ८२६ मतांनी लातूर ग्रामीण मतदार संघातून काँग्रेसचे धीरज देशमुख विजयी झाले आहेत़ मराठवाड्यात नांदेड दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबरडे हे सर्वात कमी म्हणजे फक्त ९१६ मतांनी विजयी झाले आहेत़ उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते घेण्याचा मान मात्र माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मिळाला आहे़ त्यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून तब्बल १ लाख ४० हजार ५५९ मते मिळाली आहेत़
जिल्हानिहाय पक्षीय बलाबलहिंगोली- भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी प्रत्येकी १,परभणी-शिवसेना, भाजप, काँग्रेस, रासप प्रत्येकी १,नांदेड- काँग्रेस-४, भाजप ३, शिवसेना १, शेकाप १,उस्मानाबाद- शिवसेना ३, भाजप १,लातूर- काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप प्रत्येकी २,बीड- राष्ट्रवादी ४, भाजप २,जालना- काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी १, भाजपा ३,औरंगाबाद- शिवसेना-६, भाजप ३