मागील काही वर्षांपासून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर दररोज वाढत आहेत. या दरवाढीमुळे सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. नागरिकांच्या या प्रश्नावर ९ जुलै रोजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सायकल रॅलीचे नियोजन केले होते.
शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शनिवार बाजारातील राजीव भवन येथून सायकल रॅलीला प्रारंभ झाला. नानलपेठ कॉर्नर, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर, विसावा कॉर्नर, स्टेशन रोड मार्गे सायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. या ठिकाणी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्राच्या धोरणामुळे महागाईमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, नदीम इनामदार, रवी सोनकांबळे, पंजाब देशमुख, प्रा. तुकाराम साठे, बाळासाहेब देशमुख, अतिक ऊर रहमान, नागेश सोनपसारे, सुधीर कांबळे, खदीर लाला हाश्मी, पवन निकम आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
महिला पदाधिकाऱ्यांचाही सहभाग
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने केलेल्या या आंदोलनात महिला पदाधिकारीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महापौर अनिता सोनकांबळे यांच्यासह माजी महापौर जयश्री खोबे, मलेका गफार, द्वारकाबाई कांबळे, जानूबी, जयश्री जाधव, रत्नमाला सिंघनकर आदींसह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.