कॉंग्रेसचे मौनच आघाडीतील अडथळा : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 06:10 PM2019-02-16T18:10:03+5:302019-02-16T18:10:38+5:30
या प्रश्नावर कॉंग्रेस मौन बाळगून असल्याने आघाडी संदर्भात अडथळे येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी येथे स्पष्ट केले.
परभणी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा अजेंडा कॉंग्रेसने करावा, कॉंग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी युती करेल, असे आम्ही यापूर्वीच सांगितले आहे. मात्र या प्रश्नावर कॉंग्रेस मौन बाळगून असल्याने आघाडी संदर्भात अडथळे येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी येथे स्पष्ट केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथे आयोजित सत्ता संपादन महासभेसाठी प्रकाश आंबेडकर परभणीत आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधान बदलायला निघाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणावे ही आमची प्रथम मागणी आहे. या संदर्भात अजेंडा करण्यास कॉंग्रेस तयार होत नाही. आम्ही आतापर्यंत लोकसभेच्या १२ जागा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेस सोबत आघाडी झाली तरी या जागा वगळून इतर जागांवर चर्चा होईल.
वंचित बहुजन आघाडीने राज्यातील ४८ मतदारसंघात तयारी केली आहे. कॉंग्रेस आणि इतर राष्ट्रीय पक्षांमध्ये यापूर्वीचे अनेक गोंधळ असल्याने हे पक्ष भाजपाच्या विरोधात लढू शकत नाहीत. त्यासाठी प्रादेशिक पक्षच लढा देऊ शकतात, असेही आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेस लक्ष्मणराव माने, डॉ.वानखेडे, कॉ.गणपत भिसे, वंचित बहुजन आघाडीचे निमंत्रक डॉ.धर्मराज चव्हाण, भारिपचे जिल्हाध्यक्ष दादाराव पंडित आदींची उपस्थिती होती.