परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत काम करणाऱ्या रोजंदार, हंगामी, प्रासंगिक कामगार व इतर मजूर कर्मचाऱ्यांची थकलेली भविष्यनिर्वाह निधीतील ४ कोटी रुपयांची रक्कम औरंगाबाद येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने वसूल केली आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी कायद्यानुसार कृषी विद्यापीठास १ ऑगस्ट १९८२ पासून कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा १९५२ च्या तरतुदी लागू करण्यात आल्या होत्या. असे असताना परभणी येथील वसंतराव नाईक़ मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत काम करणाऱ्या रोजंदार, हंगामी, प्रासंगिक कामगार व इतर मजुरांची भविष्य निर्वाहनिधीची रक्कम भरली नव्हती. यानुसार कार्यवाही होऊन ७ सप्टेंबर १९९४ रोजी कलम ७ (अ) अन्वये थकित रकमेचा आदेश पारित करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाले होते.
या प्रकरणाची १५ वर्षे सुनावणी झाली. यामध्ये न्यायालयाने कर्मचारी भविष्यनिधी निर्वाह कृषी विद्यापीठ आणि विद्यापीठांतर्गत संघटनेची बाजू ऐकूण घेऊन तसेच दाखल दस्ताऐवज व प्रतिवाद लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाला मजुरांची थकित भविष्य निर्वाहनिधीची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार औरंगाबाद येथील या कार्यालयाचे आयुक्त जगदीश तांबे यांनी दिलेल्या आदेशानुसार आयुक्त अशोक पगारे यांनी ही रक्कम वसुलीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतरही याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याने थकित ४ कोटी १८ लाख ११ हजार ५९ रुपयांची वसुली करण्यासाठी विद्यापीठाचे बँकखाते गोठविण्याचे आदेश जारी कररण्यात आले होते.
या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करीत प्रवर्तन अधिकारी गणेश खैरे यांनी विद्यापीठाच्या बँक ऑफ इंडियाच्या परभणी येथील शाखेतून सदरील वसुलीच्या ४ कोटी १८ लाख ११ हजार ५९ रुपयांच्या थकित रक्कमेचा धनादेश प्राप्त केला. या कारवाईत प्रवर्तन अनुभागातर्फे लेखाधिकारी वर्षा झेंडे, सुयोग सांबरे यांनी काम पाहिले. या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत क्षेत्रीय भविष्य निधी कार्यालयाचे आयुक्त जगदीश तांबे यांनी सर्व थकबाकीदारांना थकित भविष्यनिर्वाह निधी रक्कमा त्वरित जमा करण्याचे आवाहन केले आहे. भविष्य निर्वाहनिधी थकबाकीदारांविरुद्ध मालमत्ता जप्ती तसेच अटकपूर्व कारणे दाखवा नोटीस देखील जारी झाली असल्याचे सूत्रांकडून समजले.