जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत मानवत तालुक्यातील सावरगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादीत लढत होत असून ताडबोरगाव येथे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस-शिवसेना अशी लढत होत आहे. उक्कलगाव येथे शिवसेना, काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होत असून, भोसा, पिंपळा, कोथाळा येथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस तर पाळोदीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. हत्तलवाडीत राष्ट्रवादीच्या दोन पॅनलमध्ये लढत होत असून, रूढी येथे तिरंगी लढत होत आहे. खरबा येथे शिवसेना विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी तर रामपुरी येथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना लढत होत आहे. पालममधील बहुतांश गावांमध्ये पक्षविरहित लढती होत आहेत. पाथरी तालुक्यात उमरा येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. हादगाव बु. येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवेसना व इतर अशी लढत होत आहे. याशिवाय डोंगरगाव, कानसूर, विटा बु. बाबूलतार येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, देवनांद्रा येथे राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, वाघाळा येथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर बाभळगाव येथे राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध गबाळ गट अशी लढत होत आहे. लिंबा येथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. गंगाखेड तालुक्यात राष्ट्रवादी-काँग्रेस-भाजप-रासपविरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. राणीसावरगाव येथे पक्षविरहित पॅनल आहेत. इतर ठिकाणीही दोन ते तीन पॅनलमध्ये लढती होत आहेत.
भांबळे विरुद्ध बोर्डीकर लढती
जिंतूर विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी भांबळे विरुद्ध बोर्डीकर असाच ग्रा.पं. निवडणुकीत सामना होत आहे. तालुक्यातील बोरी येथे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. येथे राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसचे पॅनल आहे, तर भाजपचे स्वतंत्र पॅनल आहे. याशिवाय चारठाणा, सावंगी म्हाळसा, अंबरवाडी आदी ठिकाणीही महाविकास आघाडी दुभंगली आहे. सेलू तालुक्यात बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. झोडगावात मात्र राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना-भाजप अशी लढत होत आहे.
जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र येणे कठिणच
राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्ह्यात फक्त जिल्हा परिषदेत यशस्वी ठरला आहे. इतरत्र कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याची पुनरावृत्ती होऊ शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या एका गटामध्ये कमालीचे मतभेद आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या एका गटात वितुष्ट आले आहे, त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्र येणे कठिण आहे.