परभणी : देशात सद्यस्थितीत दहशत व भितीचे वातावरण असून संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने आज पत्रकार परिषदेत बोलताना केला.
'संविधान बचाव, देश बचाव' अभियानांतर्गत आयोजित जाहीर सभेसाठी कन्हैय्याकुमार आज परभणीत आला आहे. यावेळी त्याने शहरातील बी. रघुनाथ सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, युवक काँग्रेसचे नागसेन भेरजे, कॉ. राजन क्षीरसागर, भगवान वाघमारे, रवि सोनकांबळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, ९ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर-मंतरवर भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या, ही भारतीय लोकशाहीवर हल्ला करणारी घटना आहे. सद्यस्थितीत देशात भय व दहशतीचे वातावरण आहे. संवैधानिक मूल्यांची हत्या केली जात आहे. भारतीय लोकशाही कमजोर करुन भीडतंत्राला मजबूत करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून केला जात आहे; परंतु, असत्य हे जास्त दिवस टिकत नसते. एक- ना एक दिवस सत्याचाच विजय होत असतो, असेही कन्हैय्याकुमार म्हणाला.
सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारावेगेल्या चार वर्षापूर्वी केंद्रातील सरकारने सत्तेवर येताना जनतेला जी आश्वासने दिली होती, त्याचे काय झाले? या बाबतचा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. संविधान बचाव, देश बचाव हे अभियान कोण्या पक्षाच्या, कोण्या सरकारच्या विरोधातला कार्यक्रम नाही किंवा कोणाला पंतप्रधान पदावरुन खाली खेचण्याचा किंवा कोणाला पंतप्रधान पदावर बसविण्याचा कार्यक्रम नाही तर संवैधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे. आम्हाला भारतीय लोकशाही मजबूत करणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा देश बनवायचा आहे तर त्यांना सावरकरांच्या विचारांचा देश बनवायचा आहे.
बॅलेट पेपर, व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची गरजविविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रियेस आक्षेप घेतला जात आहे. या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, ईव्हीएमला सर्वप्रथम लालकृष्ण आडवाणी यांनी विरोध केला होता. शिवाय जगातील बहुतांश विकसित देश आता बॅलेटपेपरनेच निवडणुका घेण्याच्या तयारीत आहेत. मी आयटी इंजिनिअर नाही किंवा संगणक तज्ज्ञ नाही; परंतु, बहुतांश पक्ष संघटना बॅलेट पेपरची मागणी करीत आहेत. व्हीव्हीपॅडचा वापर वाढविण्याची मागणी करीत आहेत. तर त्या दृष्टीकोनातून विचार करण्यास काय हरकत आहे, शेवटी लोकशाहीत बहुमतालाच महत्व आहे.
दाभोलकर- पानसरे हत्या प्रकरणात संभ्रमित करण्याचा प्रयत्नपत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी मोठी कारवाई करीत आरोपींना पकडले; परंतु, महाराष्ट्रात विचारवंत नरेंद्र दाभोलकर, कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आता कर्नाटकमध्ये कारवाई होत असल्याने तेथील पोलीस महाराष्ट्रात येऊन कारवाई करतील म्हणून लोकांना संभ्रमित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कारवाई सुरु झाली आहे. यासाठी सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. याबाबत खोटी माहिती पसरविली जात आहे, असा आरोपही यावेळी कन्हैय्याकुमार यांनी केला.