परभणी : जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस दलाच्या सायबर शाखेने केले आहे.
बँकेचा व्यवस्थापक बोलतो, यासारख्या बतावण्या करून ओटीपी क्रमांक मागवून फसवणूक झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. मागील काही वर्षांपासून डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली असून, त्याचा फायदा घेत सायबर गुन्हेही वाढले आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने त्यावर प्रतिबंध मिळविण्यासाठी नागरिकांनीच काळजी घेणे गरजेचे आहे.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक होण्याचे काही प्रकार सायबर शाखेने उघड केले आहेत. त्यानुसार तीन बाबी नागरिकांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवाव्यात, त्यात बँक खात्यात जर कोणी पैसे भरणार असेल तर तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करण्याची किंवा ओटीपी देण्याची आवश्यकता नाही. इतरांना पैसे पाठविताना क्यूआर कोड स्कॅन करावा लागतो किंवा ओटीपीची आवश्यकता असते. जर क्यूआर कोड स्कॅन केला नाही किंवा ओटीपी दिला नाही तर कोणताही आरोपी बँक खात्यातून पैसे काढू शकत नाही. मात्र, बहुतांश जण या चुका करतात. त्यामुळे ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत.
परभणी येथील पोलीस दलातील सायबर शाखेच्या वतीने या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ग्राहकांनीही ऑनलाइन फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, तसेच एखाद्या व्यक्तीच्या बतावणीला, आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातील सायबर पोलीस ठाण्याने केले आहे.