डिसेंबर २०२० अखेर महावितरण कंपनीने या थकबाकीचा आढावा घेतला आहे. त्यात परभणी मंडळांमध्ये २०२० अखेर विक्रमी थकबाकी असल्याचे समोर आले. परभणी मंडळात घरगुती, वाणिज्यीक व लघु दाब औद्योगिक वीज ग्राहकांकडे ३३१ कोटी ६८ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. तर कृषी पंपाच्या वीज ग्राहकांकडे १ हजार ३८० कोटी १ लाख रुपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक पाणपुरवठा योजनेकडे १७ कोटी ६ लाख रुपये तर पथदिव्यांच्या वीज बिलापोटी १०६ कोटी २ लाख रुपये अशी एकूण १ हजार ८३८ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. वीज देयके भरण्यास ग्राहकांकडून काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असला तरी तो समाधानकारक नाही. तेव्हा ग्राहकांनी वीज बिल अदा करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
तर अधिकाऱ्यांवरही कारवाई
वीज बिलाची थकबाकी जिल्ह्यात वाढल्याने त्यास ग्राहक ज्या प्रमाणात जबाबदार आहेत, त्यापेक्षाही अधिक जबाबदारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे. वाढलेल्या थकबाकीमुळे महावितरणला आर्थिक संकटातून जावे लागत आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून वसुली मोहीम सुरू करा,असे निर्देश महावितरणने दिले असून, थकबाकी वसूल करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
राज्याच्या तुलनेत १.५ टक्का थकबाकी परभणीत
महावितरण कंपनीचे ६३ हजार ७४० कोटी रुपये राज्यातील ग्राहकांकडे थकलेले आहेत. त्यामध्ये कृषीपंपांच्या ग्राहकांकडे ४५ हजार ४९८ कोटी, वाणिज्यिक, घरगुती व औद्योगिक ग्राहकांकडे ८ हजार ४८५ कोटी व उच्चदाब ग्राहकांकडे २ हजार ४३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्याच्या तुलनेत परभणी जिल्ह्यातील ग्राहकांकडे १ हजार ८०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्याच्या एकूण थकबाकीच्या प्रमाणात परभणी जिल्ह्यात १.५ टक्के वसुली थकली आहे.