मानवत (परभणी ) : तालुक्यातील वांगी येथील वाळु घाटावर परवानगी पेक्षा १३८१ ब्रास जास्तीचा वाळु उपसा केल्याप्रकरणी ठेकेदाराला दिड कोटीचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच लिलावावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेली अनामत रक्कमही जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिले आहेत.
वांगी येथील वाळु धक्का श्रीराम कन्सस्कट्रक्सन तर्फे अण्णासाहेब अशोकराव काजळे यांना लिलावाद्वारे मिळाला होता. यानुसार ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ४४१७ ब्रास वाळुचा उपसा करण्याची परवानगी यात होती. मात्र प्रत्यक्षात येथून अधिक ब्रास वाळू उत्खनन झाले. याची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे यांनी २० मार्च रोजी पाहणी केली. यावेळी येथे एकुण ५ हजार ८९७ ब्रास वाळुचा उपसा झाल्याचा अहवाल भूमी अभिलेख कार्यालयाने दिला. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर यांनी श्रीराम कन्सस्कट्रक्सन यांना लिलावातील अटीचा भंग केल्याप्रकरणी ठेका रद्द करून १ कोटी ५२ लाख ४२ हजार रुपयाचा दंड ठोठावला. तसेच लिलावाची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले.
उपसा थांबवला मागील दोन महिन्यापासून वांगी वाळु घाटावरील उत्खनन थांबविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नुसार पुढील कारवाई केली जाईल. - नकुल वाघुंडे, प्रभारी तहसीलदार, मानवत