परभणी : पूर्णा तालुक्यातील महागाव येथे सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या सुमारास आ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रचारासाठी झालेल्या बैठकीनंतर मराठा आंदोलकांत घोषणाबाजीवरून बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडीओ माध्यमांवर व्हायरल होत आहे.
आ. रत्नाकर गुट्टे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या समर्थकांनीच ही बैठक आयोजित केली होती. गुट्टे स्वत: या बैठकीला नव्हते. मात्र ही बैठक झाल्यानंतर हा ताफा निघणार असतानाच मराठा आंदोलकांनी या ठिकाणी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे गुट्टे समर्थक व आंदोलकांमध्ये आधी शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाल्याचेही दिसून येत आहे. या प्रकारानंतर ताडकळस पोलिसांसह जिल्हा स्तरावरील काही वरिष्ठ अधिकारी गावात दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत काही जण पोलिसांतही तक्रार देण्याचा प्रयत्न करीत होते.