परभणी : कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर रक्ताच्या नात्यातील व्यक्तीनीच जन्मदात्यांना नाकारल्याने मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम परभणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच केल्याच्या तब्बल ४० घटना आतापर्यंत शहरात घडल्या आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना उपचारादरम्यान या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तींच्या पार्थिवावर शहरात मनपा कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात येतात. त्यानुसार गुरूवारपर्यंत ८६५ जनांच्या पार्थिवावर मनपा कमर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी मयताच्या कुटुंबातील ५ व्यक्तींना पीपीई किट घालून अंत्यविधीस उपस्थित राहण्याची परवनगी आहे; परंतु तब्बल ४० मयतांच्या अंत्यसंस्कारसाठी त्यांचे नातेवाईक आले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाइकांना निरोप देऊनही त्यांनी तुम्हीच अंत्यविधी उरकून घ्या, असा निरोप या कर्मचाऱ्यांना दिला गेला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनीच त्यांच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. दोन दिवसांपूर्वी तर शहरातील वसमत रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात मयत झालेल्या व्यक्तीच्या मुलांनी डॉक्टरांना आपणच अंत्यसंस्कार करा, आम्ही अंत्यसंस्कार करून शकत नाही, असे लिहून दिले. त्यामुळे या डॉक्टरांनी मनपा कर्मचाऱ्यांना बोलावून मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाण्यास सांगितले. मनपा कर्मचाऱ्यांनीही या डॉक्टरांकडून लेखी घेऊन संबधित व्यक्तीचा अंत्यविधी केला. कोरोनाच्या या काळात नात्यातील जिव्हाळा किती रूक्ष झाला आहे, याचा प्रत्यक्ष या मनपा कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षभरापासून येत आहे.
मयत आईचे दागिणे काढून ३ भाऊ गायब
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील एका महिलेचे काही दिवसांपूर्वी परभणी शहरातील बसस्थानक परिसरातील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर मृतदेह घेऊन जाण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. कर्मचारी आल्यानंतर मयत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्यांच्या नातेवाइकांनी काढून घेतले. त्यानंतर मनपा कर्मचाऱ्यास मृतदेह अंत्यविधीसाठी पुढे घेऊन चला, आम्ही पाठीमागून आलोच, असा निरोप दिला. कर्मचारी स्मशानभूमीत गेल्यानंतर या तिन्ही भावांची वाट पाहू लागले. बऱ्याच वेळेनंतरही ते आले नाहीत, म्हणून त्यांना फोन केला असता, आमची तिकडं येण्याची हिम्मत होत नाही. आम्ही टाकळीच्या पुढे आलो आहोत, तुम्हीच आता अंत्यविधी करून घ्या, असा निरोप दिला. त्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांनीच या माऊलीच्या पार्थिवावर अंत्यसस्कार केले.
८ महिन्यांच्या बाळावर अंत्यसंस्कार
१० दिवसांपूर्वी मानवत तालुक्यातील एका ८ महिन्याच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू झाला. या बाळावर अंत्यसंस्कार करताना उपस्थित कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले होते.
कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना मन खिन्न करणारे अनेक अनुभव आले आहेत; पण जनसेवेचा वसा घेऊन नातेवाईक आला नाही तरी आम्ही आमचे कर्तव्य सक्षमपणे पार पाडत आहोत. कारण आमची बांधिलकी सामाजिक जबाबदारीशी आहे.
-करण गायकवाड
कोरोनाबाधित मयत व्यक्तींच्या पार्थिवावर प्रशासकीय नियमानुसार आम्ही सर्व सोपस्कार पार पाडून अंत्यसंस्कार करीत आहोत. काही नातेवाइकांनी दुर्लक्ष केले तरी आम्ही मात्र आमची जबाबदारी समजून हे काम करीत आहोत.
- किरण गायकवाड