विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या बालकांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांची माहिती संकलित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतुने स्थलांतरित, भटके, वंचित घटकातील, भूमीहीन अथवा अल्पभूधारक कुटुंबातील बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी जिल्हाभरात जिल्हा परिषदेचे शिक्षक, विविध वाड्या, तांडे, वस्त्यांवर फिरताना सध्या दिसत आहेत. त्यांच्या पालकांकडे मुलांच्या शिक्षणाची चौकशी करून त्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रबोधन करताना शिक्षक दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी ग्रामसेवकांकडूनही या मोहिमेत सहभाग नोंदविला जात आहे. त्यामुळे ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविली जात आहे.
१ ते १० मार्च पर्यंत मोहिम
शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील ९ पैकी ८ तालुक्यांत एकूण १ हजार १६८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. फक्त मानवत तालुक्यातच ही मोहिम अद्याप सुरु नाही. एका पथकात चार शिक्षक व एका बीएलओचा समावेश आहे. ही पथके १ ते १० मार्च या कालावधीत शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांची माहिती संकलित करणार आहेत. त्यानंतर याबाबतचा अहवाल ते शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करणार आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांकडूनही शोधमोहिम
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सूचेता पाटेकर याही शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरताना दिसून येत आहेत. गंगाखेड शहर परिसरातील अहमदपूर रोड भागातील एका विटभट्टीवर जाऊन त्यांनी तेथील कामगारांशी संवाद साधाला.
तसेच उपस्थित बालकांशीही पाटेकर यांनी संवाद साधून त्यांना शाळेत प्रवेश घेण्याचा आग्रह केला. यावेळी त्यांच्या समवेत विस्तार अधिकारी बालाजी सगट, केंद्रप्रमुख संभाजी वाडेवाले, विषय साधनव्यक्ती रविकिरण सालमोटे, सखाराम तत्तापुरे, विशेष तज्ज्ञ श्रीमंत भालके, रणवीर आदी उपस्थित होते.
व्यापक जनप्रबोधन
या मोहिमेच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून व्यापक स्वरूपात जनप्रबोधन करण्यात येत आहे. यासाठी व्हाट्सअॲप, फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राम आदी समाज माध्यमांसह विविध संस्था, संघटना यांचीही मदत घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचाश शोध घेण्याची मोहिम वेगाने सुरु आहे. याबाबत सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांचेही महत्वपूर्ण योगदान लाभत आहे.
- डॉ. सूचेता पाटेकर
शिक्षणाधिकारी, जि.प.