शहरात आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात तसेच विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होतात. यामध्ये विश्व हिंदू परिषद शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची गोपाल दिंडी काढते. या दिंडीत चिमुकले वारकऱ्यांचा पेहराव करुन टाळ-मृदुंगाच्या निनादात वेशभूषेतून प्रति पंढरपूर साकारतात. परभणीकरांना हे चित्र गेल्या ४० वर्षापासून विश्व हिंदू परिषद व अन्य संघटनेच्या माध्यमातून पहावयास मिळते. मात्र, मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे शहरात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे तसेच मंदिरेही बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे मागील वर्षी व यंदा सुध्दा ही गोपाल दिंडी काढता आली नाही. याशिवाय शाळा बंद असल्याने चिमुकले घरीच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अद्याप मंदिर सुरु करण्यास व गोपाल दिंडीला परवानगी दिली नाही. यामुळे विहिपच्या वतीने यंदा माळी गल्लीतील मंदिरामध्ये केवळ पूजा करून विठ्ठलाला कोरोनामुक्तीचे साकडे घालण्यात आले तसेच शहरातील महत्त्वाच्या ४ ते ५ विठ्ठल मंदिरांमध्ये नागरिकांनी मंदिराच्या बाहेरून विठ्ठलाचे दर्शन घेत एकादशी साजरी केली. याशिवाय घरोघरी भाविकांनी धार्मिक कार्यक्रम घेत आषाढीचे महत्व जपले.
कोरोनामुळे गोपाल दिंडीला खंड, केवळ मानाची पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:14 AM