सेलू:- कोरोनाच्या धास्तीने सेलू तालुक्यातील ९४ गावातील रोजगाराच्या शोधात महानगरात गेलेले अडीच हजार ग्रामस्थ आजपर्यंत आपल्या गावी परतले असल्याची माहिती गाव पातळीवर सुरू करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.
तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील भूमीहीन आणि शेत मजूरांचे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जाऊन मिळेल ते काम करून प्रत्येक गावातील शेकडो कुटूंब महानगरात स्थलांतरीत झाले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने राज्यातील महानगरे आणि शहरे लाॅक डाऊन केले आहेत. त्यामुळे शहरात कुठेच काम उरले नसल्याने आणि खासकरून पुणे आणि मुंबईत कोरोना विषाणूचे संशयित रूगणाची संख्या वाढत असल्याने महानगरात स्थलांतरीत झालेल्या ग्रामस्थांनी कुटूंबासह आपले गाव गाठले आहे. मागील आठवड्यात पुणे, मुंबई, नाशिक येथून बस आणि रेल्वेने मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत आपल्या गावी परतले आहेत. महसूल आणि आरोग्य विभागाच्या यंञनेने बाहेर गावाहून परतलेल्या ग्रामस्थांची माहिती गाव पातळीवर शासकीय यंञणेच्या माध्यातून एकञ केली जात आहे. दरम्यान, उजाड झालेले गाव खेडी स्थलांतरित झालेले ग्रामस्थ परतल्याने गजबजले आहेत.
दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश
बाहेर गावाहून आलेल्या ग्रामस्थांची नोंद पोलीस पाटील यांना करावी लागत आहे. त्यासाठी एक स्वतंत्र रजिस्टर ठेवण्याच्या सुचना सर्व पोलीस पाटलांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावातील आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी कार्यकती यांनी गावात प्रत्यक्ष गृह भेटी देऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा माहिती अहवाल दररोज आरोग्य विभागाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच बाहेर गावाहून परतलेल्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप येत असलेतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहेत. ज्यांना कुठलेही कोरोनाचे लक्षणे आढळून आली नाहीत अशानाही घरची थांबण्याचे सांगितले जात आहे.
परदेशातून परतलेले सर्व निगेटिव्ह
अमेरिका, दुबई या परदेशातून शहरात परतलेल्या सर्व सहा नागरिकांचे स्वॅब घेऊन त्याची चाचणी घेतली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.माञ त्यांना घर न सोडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी यांनी लोकमत शी बोलताना दिली.