परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे उपचार घेणाऱ्या ३ रुग्णांचा ८ मार्च रोजी मृत्यू झाल्याने जिल्हावासीयांच्या चिंता वाढली आहे, तसेच सोमवारी नवीन १९ रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे.
मागच्या तीन-चार आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रशासन प्रतिबंधात्मक उपाय करीत असले, तरी रुग्णसंख्या मात्र वाढतच आहे. त्यातच ८ मार्च रोजी खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात चिंता निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३३४ वर पोहोचली आहे.
सोमवारी आरोग्य विभागाला ५९७ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ४७० अहवालांमध्ये ४ जण आणि रॅपिड टेस्टच्या ११२ अहवालांमध्ये १५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात आता एकूण ८ हजार ८७९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८ हजार २३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३०८ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आयटीआय हॉस्पिटलमध्ये ८२ आणि खासगी रुग्णालयात ६८ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे, १५६ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या भागात झाली रुग्णांची नोंद
परभणी शहरातील काकडेनगर, सर्वोदयनगर, विद्यानगर, गुलमोहर कॉलनी, गव्हाणे रोड, सहकारनगर, रामकृष्णनगर, बँक कॉलनी, एकनाथनगर, सागरनगर, तसेच तालुक्यातील आर्वी येथे तीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे, जिंतूर तालुक्यातील बोरी, जिंतूर शहरातील दगड चौक, हुतात्मा स्मारक परिसर, मानवत शहरातील गोदू गल्ली या ठिकाणीही सोमवारी रुग्ण आढळले आहेत.