परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग घटला असला तरी सोमवारी उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाची धास्ती कायम आहे.
दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग घटल्याने जिल्हावासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. २१ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाने दिवसभरात ३९७ नागरिकांच्या तपासण्या केल्या. त्यामध्ये ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआरच्या साह्याने तपासण्या केलेल्या ३१६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ४ पॉझिटिव्ह आढळले. तर ८१ नागरिकांची रॅपिड ॲंटीजेन टेस्टच्या साह्याने तपासणी झाली असून, त्यामध्ये दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मागील दोन आठवड्यापासून कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले होते. मात्र सोमवारी एकाच दिवशी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात शासकीय रुग्णालयात उपचार घेणारा एक पुरुष आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा समावेश आहे. दोघांचा मृत्यू झाल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता एकूण ७ हजार ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ हजार ६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २९९ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या १२० रुग्ण उपचार घेत आहेत.
१९ रुग्णांना सुटी
शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या १९ रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळली नसल्याने या रुग्णांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे. बाधित रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.
या भागात आढळले रुग्ण
सेलू शहरातील शास्त्रीनगर येथील ३८ वर्षीय महिला, विद्यानगरातील ३२ वर्षीय पुरुष, परभणी शहरातील लोकमान्यनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, सिंचननगरातील ३५ वर्षीय पुरुष, नवा मोंढा भागातील ४४ वर्षीय पुरुष आणि मानवत शहरातील मेनरोड भागातील ६१ वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी कोरोनाबाधित आढळलेल्या ६ रुग्णांमध्ये ५ पुुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.