कोरोना संसर्गापूर्वी जिल्ह्यातील रुग्णांची सर्व मदार केवळ जिल्हा रुग्णालयावर अवलंबून होती. खाटांची चणचण जाणवत असली तरी उपलब्ध खाटांवरच रुग्णांना उपचार घ्यावे लागत. मात्र कोरोनाच्या संसर्गानंतर शहरात दोन मोठ्या रुग्णालयांची भर पडली. त्यात आयटीआय हॉस्पिटल आणि जिल्हा परिषदेच्या इमारतीतील कोविड रुग्णालयाचा समावेश आहे. विशेष म्हणजे याच काळात दोन ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.
ग्रामीण भागातही वाढ
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय साधनांची कमतरता होती. मात्र कोरोना काळात १४ व्या वित्त आयोगातून बीपी ॲपेरेटस, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन यासह इतर अद्यावत सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्र सक्षम झाले आहेत.
गंगाखेड, सेलूत सर्वाधिक सुविधा
कोरोना संसर्गाच्या पूर्वी गंगाखेड आणि सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या होत्या. मात्र या संसर्गानंतर दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गंगाखेड येथे १० ऑक्सिजन खाटांची निर्मिती झाली असून, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात २० ऑक्सिजन खाटा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे व्हेंटिलटरचीही सुविधा या दोन्ही ठिकाणी उपलब्ध करण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोना केअर सेंटरच्या माध्यमातून तालुक्यातील रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे दोन्ही उपजिल्हा रुग्णालयांत कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोनानंतर हे दोन्ही रुग्णालये सुविधांनी सक्षम झाले आहेत. त्यामुळे स्थानिक रुग्णांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.