परभणी : मागच्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी दिवसभरात २७ नवीन रुग्णांची भर पडली आहे.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. शहरात सर्व व्यवहार सुरू झाले. मात्र, त्याचबरोबर नागरिकांनी कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम गुंडाळून ठेवले. त्यामुळे वाढलेली गर्दी, प्रशासनाची बेफिकिरी, मास्क, सॅनिटायझरचा कमी झालेला वापर, यामुळे मागच्या चार दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. बुधवारी ३६५ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. १५ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ८ हजार १६२ झाली असून, त्यापैकी ७ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३१८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या १३३ रुग्ण उपचार घेत आहेत.