परभणी : विदेशातून परभणीत आलेल्या एका नागरिकांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याच्या जिनोम सिक्वेन्सीनग अहवालाची आता प्रतीक्षा लागली आहे.
राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संकट निर्माण झाल्यानंतर विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. २४ डिसेंबर रोजी युके येथून आलेल्या एका नागरिकाची आरटीपीसीआर तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने २६ डिसेंबर रोजी या नागरिकाचा स्वब नमुना जिनोम सिक्वेन्सीनगसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविला आहे. या अहवालानंतरच या रुग्णास ओमायक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला आता पुणे येथील प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा लागली आहे.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या नागरिकास सध्या परभणी येथील शासकीय कोविड रुग्णालयात विलगिकरणात ठेवले आहे. त्यास सर्दी, खोकला आणि ताप असल्याची माहिती आरोग्य विभागातून मिळाली.