परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील तपासण्यांची संख्या मात्र कमी केली नाही. दररोज पाचशे ते सहाशे नागरिकांच्या तपासण्या होत असून, सहा दिवसांमध्ये साडेचार हजार नागरिकांच्या तपासण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तपासण्या कमी झाल्या की, रुग्ण कमी होतात, असे सर्वसाधारणपणे सांगितले जाते, परंतु ग्रामीण भागात मात्र तपासण्या आजही कमी करण्यात आल्या नाहीत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये दररोज आरटीपीसीआर आणि रॅपिड तपासण्या करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे, तर दुसरीकडे शहरी भागातील तपासण्या मात्र घटल्या आहेत.
ग्रामीण भागात दररोज पाचशे ते सहाशे नागरिकांच्या आरटीपीसीआर व रॅपिड चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे मानले जात आहे.
५ ते १० सप्टेंबर या सहा दिवसांमध्ये जिल्ह्यात ३ हजार ३८३ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या आहेत, तर १ हजार २८१ नागरिकांच्या रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यात आरटीपीसीआर चाचण्या आणखी वाढविण्याची निर्देश देण्यात आले असून, त्या दृष्टीने आरोग्य विभागाने काम सुरू केले आहे.
दररोज केलेल्या चाचण्या
५ सप्टेंबर ५१०
६ सप्टेंबर ८२०
७ सप्टेंबर ५९६
८ सप्टेंबर १,२२१
९ सप्टेंबर १,०७६
१० सप्टेंबर ४४१