गंगाखेड (जि.परभणी): गंगाखेड ते परभणी रस्त्याच्या कामावर असलेल्या बिहार राज्यातील एका ५० वर्षीय कोरोना संशयित मजुराचा परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत होता, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
गंगाखेड ते परभणी रस्त्याच्या कामावर काम करण्यासाठी बिहार राज्यातील मजूर गंगाखेड तालुक्यात आले आहेत. महातपुरी फाटा येथे कामाच्या बाजुला पत्र्याचे शेड करुन राहत असलेल्या येथील एका ५० वर्षीय मजुराला १३ मे रोजी सर्दी, खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला सोबतच्या सहकाऱ्यांनी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर या मजुराची कोरोना तपासणी करुन त्याचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. या स्वॅबचा अहवाल येण्यापूर्वीच शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असताना या मजुराचा मृत्यू झाला. त्यामुळे या मजुराच्या संपर्कातील अन्य ५ मजुरांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोन मजुरांना महातपुरी फाट्याजवळील कामाच्या साईटवर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच शेड लगत असलेल्या वीटभट्टीवरील १३ मजुरांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोना संशयित मजुराच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार स्वरुप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमाकांत बिराजदार, महातपुरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोहर ब्याळे आदींनी सदरील मजूर राहत असलेल्या ठिकाणास भेट देऊन या कामावरील अभियंता मजुरांची भेट घेतली व त्यांना स्वॅब अहवाल येईपर्यंत क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, या मजुराचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे यापूर्वी परभणी तालुक्यातील पिंपळगाव टोंग, परभणी शहरातील खंडोबा बाजार येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा अशाच पद्धतीने महिनाभरापूर्वी मृत्यू झाला आहे. या दोन्ही व्यक्तीही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत्या. त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण आरोग्य विभागाकडून अद्यापपर्यंत स्पष्ट करण्यात आलेले नाही.