कोरोना प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यातील शाळा २० मार्चपासून बंद होत्या. अनलॉक प्रक्रियेनंतर राज्य शासनाने प्रारंभी दहावी ते बारावी, त्यानंतर नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. या दृष्टिकोनातून जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. या शाळांमध्ये शिकविणाऱ्या सर्व खासगी व जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आरटीपीसीआर तपासणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. २६ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे शिक्षणाधिकारी पाटेकर यांनी सांगितले.
सात हजार शिक्षकांची कोरोना टेस्ट
शिक्षण विभागाच्या वतीने प्रत्येक केंद्रस्तरावर शिक्षकांची कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार आतापर्यंत दहा हजार ९९१ पैकी सात हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये बहुतांश शिक्षकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
‘‘२७ जानेवारीपासून जिल्ह्यात सहावी ते आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाची तयारी सुरू आहे. जवळपास ६५ टक्के शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्याही लवकरच पूर्ण केल्या जातील.
-डॉ. सुचेता पाटेकर, शिक्षणाधिकारी