सेलू: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने सेलू शहरात शनिवारी भरणार आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोरोनाची धास्ती न घेता शनिवारचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणे भरला.
कोरोना विषाणूची बाधा तसेच प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आढावा बैठकीत आठवडी बाजार बंद ठेवण्याचे तोंडी आदेश संबंधित अधिका-यांना दिले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी दोन दिवसापूर्वी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
या संदर्भात नगर पालिकेचे मुख्याधिकारी देवीदास जाधव यांनी शुक्रवारी प्रसिद्धीपञक काढून आवाहन केले होते. परंतू हे आवाहन झुगारून भाजीपाला,फळ, किराणा माल, खाद्य पदार्थ छोटे मोठे व्यापा-यांनी आठवडी बाजारात दुकान नेहमी प्रमाणे १४ मार्च रोजी थाटून आपला व्यवसाय केला. विशेष म्हणजे ग्राहक देखील नेहमी प्रमाणेच बाजारात खरेदी करण्यासाठी दाखल झाले होते. दर शनिवारी आठवडी बाजारात लाखो रूपयांची उलाढाल होते. तसेच शेकडो छोट्या व्यावसायिकांची येथील उलाढालीतून उपजिका अवलंबून आहे. कदाचित याच कारणाने आणि मालाचा होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाचे झुगारून आठवडी बाजार भरला असावा.