सेलू :- येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कोरोना बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कातील एका ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकाचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. यामुळे खळबळ उडाली असून सेलूकरांची चिंता वाढली आहे. १६ पैकी प्राप्त झालेल्या ७ अहवाल पैकी ६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सेलू शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील एका अधिका-याला परभणीत कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील १६ कर्मचाऱ्यांना ३ जुलै रोजी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील रवळगाव येथील एक आणि शहरातील मोंढा परिसरातील एक महिला आणि शास्ञी नगरातील एक अशा तीन अतिसंपर्कातील कर्मचा-याचे स्वॅब घेतले होते. मंगळवारी या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील सर्व १६ कर्मचारी आणि इतर ३४ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवारी यातील ७ स्वॅब अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर एक पॉझिटिव्ह आला.
पॉझिटिव्ह अहवाल आलेला मारोती नगरातील रहिवासी असून शहरातील ग्राहक सेवाकेंद्राचा संचालक आहे. सेवाकेंद्रावर व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची मोठी संख्या आहे. यामुळे सेलूकरांची धास्ती वाढली आहे. मात्र, १ जुलैपासून केंद्र बंद असून घरात तो एकटाच राहत असल्याची माहिती आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत समोर आली आहे.