परभणी : शहरातील एमआयडीसी परिसरात नातेवाईकांकडे आलेला एक २१ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळला असून, तो पुणे येथून १३ एप्रिल रोजी परभणीत आला होता़ त्याच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे़
परभणी जिल्ह्यातील सर्व सिमा बंद करण्यात आल्या असल्या तरी १३ एप्रिल रोजी पुण्याहून सकाळी ७ च्या सुमारास एक युवक मोटारसायकलद्वारे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील सिमा नाक्यावरुन शहरात दाखल झाला़ घशाचा त्रास जाणवत असल्याने तो स्वत:हून या दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाला़ येथील वैद्यकीय अधिकाºयांनी त्याची तपासणी करून त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविले होते़ याबाबतचा अहवाल गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास प्रशासनास प्राप्त झाला़ त्यामध्ये सदरील तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली़ या तरुणाची प्रकृती स्थिर आहे़ हा तरुण शहरातील एमआयडीसी भागातील एका बाजुला असलेल्या बहिणीच्या घरी १३ एप्रिल रोजी आला होता़ त्यामुळे त्याच्या कुटूंबातील ९ सदस्यांना तसेच परभणी-बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील ढालेगाव येथील नाक्यावरील ३ पोलीस कर्मचारी आणि २ अन्य अधिकारी अशा एकूण १४ जणांना तातडीने जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले़ या सर्वांचे स्वॅब नमुने घेवून ते तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली़
दुचाकीवरुन केला जिल्ह्यात प्रवेशकोरोना पॉझिटिव्ह आढळलेला तरुण हा हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील रहिवासी असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले़ परभणी येथील एमआयडीसी भागात त्यांची बहिण कुटूंबियांसह राहते़ तो त्यांना भेटण्यासाठी १३ एप्रिल रोजी सकाळी परभणी शहरात आला होता़ त्याच्यासोबत त्याचा मोठा भाऊही होता़ या २१ वर्षीय तरुणाला परभणीत सोडून त्याचा भाऊ हिंगोली जिल्ह्यातील त्याच्या सासरवाडीतील गावी गेला होता़ त्यालाही गुरुवारी ताब्यात घेवून आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले़ या तरुणाची पुणे येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात तपासणी झाल्याचे समजते़ त्या दृष्टीकोणातून प्रशासन माहिती घेत असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले़ या तरुणाची बहिण परभणी शहरात घरकाम करते़ त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी सदरील महिला कामाला जात होती, त्या घरांमधील व्यक्तींनाही क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी दिली़