परभणी : संचारबंदीचे उल्लंघन करून रस्त्यांवर येऊ नका, असे वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने आता पोलिसांनी कडक पवित्रा घेतला असून, परभणीतील ६ तर ताडकळसमधील ४ अशा एकूण १० जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ संचारबंदी दरम्यान नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते ११ चा वेळ देण्यात आला आहे़ असे असतानाही अनेक नागरिक अनावश्यकपणे रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत़ प्रारंभी पोलिसांनी गुन्हे दाखल न करता या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद दिला़ त्यामुळे रस्त्यावर फिरणाºया रिकाम टेकड्यांची गर्दी कमी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु, पोलीस पुढे निघून गेले की, पुन्हा रस्त्यावर येणाºयांची संख्या कायम राहू लागली़ त्यामुळे आता पोलिसांनी अशांना लाठ्यांचा प्रसाद देण्याऐवजी थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे़ या अंतर्गत परभणी शहरात ३० मार्च रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यांतर्गत विनोद मधुकर कांबळे (वैभवनगर), संकेत सुधाकर माळी (रामकृष्णनगर), विकास ढोके (साईबाबानगर), आॅटो चालक शेख अजहर शेख बशीर (वांगी रोड), मोटारसायकल चालक राजहंस बन्सी भोसले (जुना पेडगाव रोड), आॅटो चालक मुंजाजी तुळशीराम पाचंगे (रमाबाई नगर) या सहा जणांविरुद्ध संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी तसेच तोंडाला रुमाल न बांधता फिरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या शिवाय ताडकळस येथे आकाश तुकाराम फुलवरे, गणेश तुकाराम फुलवरे, लक्ष्मण मुरलीधर आवरगंड, दिगंबर प्रभाकर आवरंगड हे चार जण ३० मार्च रोजी सायंकाळी ६़४५ च्या सुमारास गावात संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करून व तोंडाला मास्क न लावता तसेच सोशल डिस्टन्स न ठेवता सहज साथ रोगाचा प्रादुर्भाव होवू शकेल, अशा स्थितीत आढळून आले़ त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीस हवालदार गणेश उत्तमराव चनखोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़