परभणी: जिल्ह्यात आणखी २ कोरोनाबाधित व्यक्तींचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ४४ झाली आहे.
परभणी तालुक्यातील नांदापूर येथील एका ८८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी ४ आॅगस्ट रोजी दुपारी १.४९ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना या व्यक्तीचा ५ आॅगस्ट रोजी सकाळी १०.४९ वाजता मृत्यू झाला. तसेच सेलू तालुक्यातील राजवाडी येथील ६० वर्षीय संशयित महिलेस पोटाचा त्रास होत असल्याने ४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे या महिलेची रॅपिड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यात या महिलेचा अहवाल निगोटिव्ह आला. त्यानंतर स्वॅब घेऊन तो नांदेड येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.
सदरील महिलेवर उपचार सुरु असतानाच मंगळवारी रात्री १०.१५ वाजता तिचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १ वाजता या महिलेचा स्वॅब अहवाल प्राप्त झाला. त्यात ही महिला पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यात आता एकूण मयतांची संख्या ४४ झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ७४३ कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यातील ३९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.