परभणी : जिल्ह्यात मंगळवारी रात्री ३१ रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६७ एवढी झाली आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. उर्वरित ६५ रुग्ण कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. २६ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार परभणी तालुक्यात १२, पूर्णा तालुक्यात १०, सेलू २, गंगाखेड ४, पालम १ आणि जिंतूर तालुक्यात २ रुग्ण आढळले आहेत. गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयातील २ डॉक्टर आणि एक परिचारिका कोरोनाबाधित झाली असून, माखणी येथील एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी एकूण १५२ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८५ जणांचे अहवाल निगेटीव्ह असून, ३१ जणांचे पॉझिटीव्ह आहेत. २७ स्वॅब अनिर्णायक आहेत. तर ३ स्वॅब अहवाल रिजेक्ट केले आहेत.