परभणी: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४ रुग्णांचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १५५ जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणी शहरातील दत्तनगर भागातील ७५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याने ७ सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ११ सप्टेंबर रोजी पहाटे ३.२८ रोजी या महिलेचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आरळ येथील ७३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५५ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे ५. २१ वाजता या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परभणी शहरातील अंबानगरी भागातील ६२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याने ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.५० च्या सुमारास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचा उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मृत्यू झाला.
तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील ६७ वर्षीय पुरुषास कोरोनाची लागण झाल्याने ८ सप्टेंबर रोजी रात्री ९.२० च्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास मृत्यू झाला. जिल्ह्यात एकाच दिवसात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यृ झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ हजार ८७२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.