गंगाखेड: उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी ( दि. २६) केलेल्या अँटीजन रॅपिड टेस्टमध्ये शहरातील राष्ट्रीयकृत बँकेतील चार कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे बँकेच्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहरातील राष्ट्रीयकृत बँकेतील ४० वर्षीय महिला कर्मचारी मंगळवारी (दि. २५) पॉझिटिव्ह आल्या. त्या बँकेत सेविका असल्याने त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण २१ जणांची दि. २६ ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयात अँटीजेन रॅपिड टेस्ट किटने तपासणी करण्यात आली. यामध्ये या महिलेचा ८ वर्षीय मुलगा व शनिवार बाजार परिसरात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेतील २४ वर्षीय महिला कर्मचारी तसेच २६ वर्षीय एक आणि २८ वर्षीय दोन पुरुष कर्मचारी असे चार कर्मचारी व मन्नाथ नगर परिसरातील ३५ वर्षीय पुरुषासह एकूण सहा जण कोरोनाबाधित आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे आज पॉझिटिव्ह आढळलेले बँक कर्मचारी कॅशिअर म्हणून काम करतात. यातून अनेक ग्राहकांशी त्यांचा संपर्क आला आहे.
राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संपर्कातून मंगळवारी एक व बुधवारी चार असे दोन दिवसात एकूण पाच कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यामुळे बँक परिसर प्रतिबंधीत करण्यात आला आहे. दरदिवशी बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील शेकडो ग्राहकांत खळबळ उडाली आहे.