परभणी : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या परभणी शहरातील तिन्ही व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दिल्ली येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर अलर्ट झालेल्या जिल्हा प्रशासनाने परभणी जिल्ह्यातून किती नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले, याची माहिती घेतली असता परभणीतील तिघे दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परभणीत आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या तिन्ही जणांना जिल्हा रुग्णालयात आणून मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांचे स्वॅब घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत त्याच दिवशी पाठविण्यात आले होते.
या संदर्भातील अहवाल गुरुवारी सकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये तिन्ही जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे परभणीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या तिन्ही जणांच्या संपर्कात जिल्ह्यातील पाच जण आले होते. त्यापैकी एक जण राजस्थानमध्ये गेला असून, अन्य चार जणांचे स्वॅबही घेऊन ते पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल गुरुवारी सायंकाळी किंवा शुक्रवारी सकाळी मिळण्याची शक्यता आहे.