परभणी: केंद्र शासनाच्या वतीने राज्यातील कोरोनाची माहिती घेतली जात असून याच अनुषंगाने १० सदस्यांचे केंद्रातील पथक २३ मे रोजी जिल्ह्यात दाखल झाले आहे. ग्रामीण भागात फिरुन पथकातील सदस्य कोरोनाच्या अनुषंगाने माहिती संकलित करीत आहेत.
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. कोरोना पसरण्याची कारणे, या अनुषंगाने झालेल्या तपासण्या, रुग्णांची स्थिती, इतर आजार असलेले रुग्ण आदी बाबतचे राज्याची माहिती केंद्रस्तरीय पथकाकडून घेतली जात आहे. त्यातूनच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचे १० डॉक्टर्स परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. राज्यातील एकूण ६ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण होत असून त्यात परभणी जिल्ह्यातही हे डॉक्टर दाखल झाले आहेत. केंद्रस्तरीय पथकाने केलेल्या सर्वेतून उपलब्ध झालेली आकडेवारीनंतर भविष्यातील रणनिती ठरविण्यात येणार आहे. त्यातूनच हे पथक सर्वेक्षण करीत आहे.
जिल्ह्यातील पिंपरी खवले (ता.सेलू), भोगाव देवी (ता.जिंतूर), ताडलिमला (ता.परभणी), किन्होळा बु. (मानवत), नैकोटा (ता.सोनपेठ), फरकंडा (ता.पालम) आणि परभणी जिल्हा रुग्णालयातील वार्ड ५, वार्ड क्रमांक ४० तसेच सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयातील वार्ड क्रमांक ५ मध्ये या पथकाने सर्वेक्षण सुरु केले आहे.
रोग प्रतिकार शक्तीची घेणार माहितीकेंद्रस्तरावरुन आलेले हे डॉक्टर्स प्रत्येक गावामध्ये जाऊन ४० घरांचे सर्वेक्षण करणार आहेत. त्यात घरातील १८ वर्षावरील व्यक्ती किती, महिलांची संख्या, ज्येष्ठ नागरिकांची संख्या घेतली जाणार आहे. त्यानंतर सर्वात जास्त वयस्क व्यक्तीच्या रक्ताचा नमुना (सिरम) घेऊन रोग प्रतिकारशक्तीचे प्रमाण केंद्रीय प्रयोगशाळेत तपासले जाणार आहे.