परभणी: जिल्ह्यात आतापर्यंत ५५९ संशयितांची नोंद प्रशासनाने घेतली असून त्यापैकी ४९७ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील ४४१ जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मंगळवारी आणखी १६ जणांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये, या उद्देशाने प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधून संशयितांची नोंद घेतली जात आहे. आतापर्यंत ५५९ संशयितांची नोंद घेण्यात आली असून ४९७ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील ४४१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. आणखी ३७ अहवाल प्रलंबित आहेत. २१ एप्रिल रोजी १६ संशयित नव्याने दाखल झाले असून त्यांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. एकूण नोंद झालेल्या ५५९ संशयितांपैकी २६९ संशयितांचे विलगीकरण करण्यात आले. सध्या २७ जण रुग्णालयाच्या संसर्गजन्य कक्षात दाखल आहेत. तर २६३ जणांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आजपर्यंतच्या कोरोना विषयक स्थितीचा आढावा घेण्यात आला. भविष्यात करावयाच्या उपाययोजना या विषयी जिल्हाधिका-यांनी सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांच्यासह वैद्यकीय अधिकाºयांची उपस्थिती होेती.