परभणी : परभणी जिल्हा कोरोनामुक्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आता संशयित नागरिकांच्या तपासणीवर भर दिला आहे. त्यातूनच जिल्ह्यात आतापर्यंत ७१६ संशयित नागरिकांची तपासणी केली असून, ४१ जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे़
पुणे येथून परभणीतील नातेवाईकांकडे आलेला हिंगोलीतील युवक कोरोनाग्रस्त झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात १४ दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले़ हा युवक आता कोरोनामुक्त झाला आहे़ त्यामुळे जिल्हावासियांना दिलासा मिळाला़ यापुढे जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळू नये, यासाठी आरोग्य प्रशासनाने संशयित नागरिकांची तपासणी करण्यावर भर दिला आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ७१६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे़ ६७४ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते़ त्यापैकी ६२३ जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत़ सध्या ४१ जण रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात दाखल आहेत़ २७७ जणांचे विलगीकरण करण्यात आले असून, ३९८ जणांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाला आहे़ त्यामुळे नवीन संशित जिल्ह्यात दाखल होवू नयेत, याचीच काळजी प्रशासन घेत आहे़