मानवत: शेळ्या खरेदी करण्यासाठी शहरात आलेल्या भिवंडी येथील चारही व्यापा-यांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
भिवंडी येथील चौघेजण ७ एप्रिल रोजी एका खाजगी वाहनाने मानवत शहरात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. राष्ट्रीय महामार्गावरील आधारवड मारोती मंदिराजवळ या वाहनास थांबवून पोलिसांनी व्यापा-यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. चारही व्यापा-यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. या स्वॅब नमुन्यांचा अहवाल ९ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला आहे. चौघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्याने मानवतकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या व्यापा-यांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी तहसील कार्यालय परिसरात असलेल्या वसतिगृह परिसरात विलगीकरण कक्षात १४ दिवस ठेवले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.